पूर्व परवानगी न घेताच केली विहिरीची तोडफोड.

Bhairav Diwase
नगर पंचायतची अरेरावी, की गफलत?

जागा मालकाची पोलिसात धाव.
Bhairav Diwase. Dec 23, 2020
पोंभूर्णा:- पोंभूर्णा नगर पंचायतीची प्रभाग निहाय संरचना व आरक्षण काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले. निवडणूकीचा कार्यक्रम अजून जाहीर न झाल्याने आचारसंहिता अजून लागलेली नाही. परंतु निवडणूक कधीही घोषीत होऊ शकते म्हणून पोंभूर्णा नगर पंचायतीने शहरातील ५-६ विहीरींचे सौंदर्यीकरण व दुरूस्तीचे काम हाती घेतले. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक-२ व नव्या संरचनेनुसार प्रभाग-३ मधील विहीर दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम गोत्यात येवून ते प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

झाले असे, की पोंभूर्णा नगर पंचायत प्रशासनाने शहरातील ५ विहीरीसह सध्याच्या प्रभाग क्रमांक-३ मधील विहीर दुरूस्ती व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली. या सर्व कामांची ई-निविदा काढण्यात आल्याचे ऐकीवात आहे. परंतु मुळचे सातारा तुकुम येथील प्रविण सुरेश चिचघरे यांनी हे काम बंद पाडले. प्रविण चिचघरे नी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार ती विहीर त्यांच्या मालकीच्या जागेत असल्याची माहिती पुढे येत असुन मौजा-पोंभूर्णा, तलाठी साजा क्रमांक-४ भुमापन क्रमांक १०६६ आराजी ०.२४ हेआर. असे त्या जागेचा तपशील आहे. मौजा-पोंभूर्णा तलाठी कार्यालयाने दिलेल्या ७/१२ प्रमाणे त्या जागेत एक पक्की विहीर असुन, इत्तर अधिकारातील नोंदीत त्या विहिरीवर शेतकऱ्याचा कब्जा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही पूर्व सुचना किंवा पूर्व परवानगी न घेता माझ्या स्वमालकीच्या व माझ्या ताब्यात असलेल्या पक्क्या विहीरीची तोडफोड करून नगर पंचायत प्रशासनाने कसुर केला असल्याने मुख्याधिकारी व पदाधिकारी यांचेवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी करणारी लेखी तक्रार पोलीसात दाखल केली आहे. 

एवढ्यावरच न थांबता प्रविण चिचघरे नी नगर पंचायत प्रशासनाकडे माहिती चा अधिकार दाखल केला असुन,विहीरीचे सौंदर्यीकरण व बांधकाम करणे बाबत काढण्यात आलेली निविदा, जाहिरात, अंदाजपत्रक आणि त्या अनुषंगाने आलेल्या निविदा धारक व कंत्राटदाराची यादी, निविदा मंजूर झालेल्या कंत्राटदाराच्या कार्यारंभ आदेशाची झेराॅक्स प्रत, विहीरीचे सौंदर्यीकरण व प्लॅटफॉर्म बांधकाम करण्याबाबत नगर पंचायत ने घेतलेल्या ठरावाची प्रत, आणि कोण-कोणाच्या घराजवळील विहीरींचे सौंदर्यीकरण करावयाचे होते त्या सर्व विहिरीची यादी इत्यादी विस्तृत माहिती पुरविण्याची विनंती केली आहे. 


नगर पंचायत कडे माहिती अधिकाराचा फलकच नाही..?

पोंभूर्णा नगर पंचायत कार्यालयाच्या इमारतीचा पोंभूर्ण्यातच नव्हे, तर जिल्ह्यात देखणी इमारत म्हणून नांवलौकिक आहे. मोठ्यात मोठ्या शासकीय कार्यालयापासुन लहाण्यात लहान कार्यालयापर्यंत पारदर्शक प्रशासकीय कामाचा हेतु ठेवून माहिती अधिकाराद्वारे माहिती मागण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरीकास आहे. माहिती अधिकाराबाबत माहिती दर्शविणारा फलक, जसे की माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, अपिलीय अधिकारी वगैरे दर्शनी भागात लावणे सर्व शासकीय कार्यालयास बंधनकारक आहे. असे असताना देखील नांवलौकिक मिळविलेल्या या नगर पंचायत प्रशासनाच्या इमारतीत दर्शनी भागात सोडाच, पन इतरत्र कुठेही माहिती अधिकाराचा फलक दिसुन येत नाही. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनातील माहिती अधिकारी नेमका कोन? असा संभ्रम निर्माण होण्यास भाग पाडते.