विरुर-सुब्बई-कवीटपेठ-चिंचोली या जंगल परिसरातील रेतीची खुलेआम तस्करी.

Bhairav Diwase
रेती तस्करांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- वन विभागाच्या निष्काळजीपणा व वनाधिकारी यांच्या आशीर्वादाने राजुरा तालुक्यातील विरुर-सुब्बई- कवीटपेठ-चिंचोली या चार नाल्यातून खुलेआम रेतीची तस्करी सुरू आहे. या परिसरात रेती तस्करांनी अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती साठवून ठेवल्याची माहिती आहे. आज घडीला विरुर-सुब्बई-कवीटपेठ-चिंचोली या चार बीटातील नाले रेतीमुक्त झाल्याचे समजते.
            

          या ठिकाणाहून दररोज पाच ते सहा ट्रॅक्टर व हायवा राजरोसपणे रेतीची चोरी करीत असून यावर कोणाचाही वचक नाही. रेती तस्कर मुक्तपणे हा व्यवसाय करीत असून त्यांना वन विभागातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याची परिसरात चर्चा आहे. रेती तस्करांचे वन विभाग व विभागातील अधिकारी लोकांशी अर्थपूर्ण असलेले संबंध रेती चोरांचे मनोबल वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच रेती तस्करांचा बंदोबस्त करून या बिटातुन चोरी जात असलेल्या रेतीची तस्करी लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. रेती तस्करांविरुद्ध वेळीच उपाययोजना न केल्यास वन विभागातील अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी असा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे.