सावली वनपरिक्षेत्रातील प्रकार.
सावली:- सावली तालुक्याचे मुख्यालय असून वनविभागाचे वनपरिक्षेत्र कार्यालय तर 5 उपवनक्षेत्र कार्यरत आहेत. मात्र वनांचे सरक्षण करण्यास सावली येथील वन विभाग अपयशी ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सावली येथे वन विभागाचे प्रादेशिक कार्यालय असून वनाचे संरक्षण करण्याकरिता संबंधित विभागाने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याची चर्चा आहे. वनातील रानगवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असून डिसेंबर ते जानेवारी महिन्यात या रानगवताची विल्हेवाट लावायला पाहिजे होती. परंतु संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने जंगलात वणवा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाययोजना म्हणून वन विभागाने 20 अग्नी रक्षकांची नेमणूक केली असली तरी जंगलातील आग आटोक्यात आणण्यास वनविभागाची ही व्यवस्था तोकडी पडत आहे. त्यामुळे जैवविविधतेला याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सावली वनपरिक्षेत्रात वाघांची शिकार झाल्याच्या घटना सुध्दा घडलेल्या आहेत. त्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ आहे की, घट आहे हा संभ्रमच आहे. अनेक उपवन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे तर वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून पाणवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु उन्हाळा सुरू होऊनही पाणवठे कोरडे आहेत. त्यामुळे जंगलातील हिंस्त्र पशुचा वावर गावाच्या दिशेने होत असून हिंस्त्र पशुच्या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याच्या घटना सावली तालुक्यात घडलेल्या आहेत. मात्र अशा गंभीर बाबीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्लक्ष करीत असून वनांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.
वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे जंगलात काही ठिकाणी आग लागली असून जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर वाघाच्या संख्येबाबत संभ्रम निर्माण करणारे उत्तर मिळत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे
अनिल स्वामी तालुकध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी