बाप्पा मला 'मातीचाच' हवा! #Ganpati #Bappa

Bhairav Diwase
महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव प्रारंभ झालाय. परंतु गणपती बाप्पाच्या आगमनसोबतच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मुर्त्यांचे पीक येण्याची भिती देखील आहेच. ही भिती निरर्थक ठरवण्याची जबाबदारी अर्थातच नागरिकांची म्हणजेच बाप्पाच्या भक्ताची आहे. ‘पीओपी’चे स्वरूप आणि त्यापासून तयार झालेल्या मूर्त्या प्रदूषणास कश्या पूरक ठरतात, ते पाहूया. #Ganpati #Bappa
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) म्हणजे पांढरा बारीक भुरका असतो. जो पाण्यासोबत मिसळल्यानंतर कडक बनतो. पीओपीचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट डिहायड्रेट असे आहे. हा पदार्थ त्याच्या आकर्षक व मऊ गुळगुळीत फिनिशिंगसाठी ओळखला जातो. पण पीओपीपासून निर्माण केलेल्या मुर्त्या मात्र पर्यावारणासाठी घातक ठरतात. कारण त्या सार्वजनिक जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्यानंतर पाणी बराच काळापर्यंत मलीन राहते, पाण्याचे वाहतेपण रोखले जाते त्यात एक साचलेपण येतं. पीओपी पाण्यात सहजतेने विरघळत नाही वर त्यातील रासायनिक तत्वे पाण्यातील जीवनदायी अंश नष्ट करतात. तसेच मुर्त्यांचे पूर्ण विसर्जन न झाल्याने त्यांची अर्धवट, खंडित झालेले अवशेष पाण्यावर तरंगत राहतात. तात्पर्य काय तर मनोभावे घरी आणून साग्रसंगीत आराधना केलेल्या देवाच्या मूर्तीची विटंबना होते. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून बनलेली मूर्ती मातीच्या/शाडूच्या मूर्तीपेक्षा कितीही सुरेख असली तरीही पर्यावरण पूरक नाही म्हटल्यावर सच्च्या भक्तांनी पीओपी मूर्तीची निवड करायला नको. शास्त्रानुसार सुद्धा शाडूच्या / मातीच्याच गणेश मूर्तीच्या पूजेचे खरे अध्यात्मिक महत्व आहे. त्यामुळे गणेशभक्तांचे प्राधान्य मातीच्या मूर्तीलाच हवे.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व्हावा यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून, पीओपी मूर्ती निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये यावर सक्त पाळत ठेवली जाणार आहे. दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकान सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाईची तरतूद आहे.
प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ महत्वाची असते. त्यामुळे नागरिकांनी मनपाच्या या मोहिमेत आपले योगदान देताना गणेश मुर्तींचे विसर्जन न करता प्रतिकात्मक विसर्जन करावे व मुर्ती दान करावी. अथवा घरगुती बाप्पांचे विसर्जन शक्यतो घरीच करावे किंवा फिरते विसर्जन कुंड, कृत्रीम विसर्जन कुंड, निर्माल्य कुंडाचा वापर करावा. थर्माकोल आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा. उत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
तद्वतच सार्वजनिक गणेश मंडळांनी वृक्षलागवड, जलसंधारण, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, स्वछता, वातावरण बदल जागृती, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी विषयांवर आधारित देखावे साकारावेत. तसेच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करावी. त्याचप्रमाणे कोरोना नियमावलीचे पालन करावे व ऑनलाईन दर्शन, फेसबुक लाईव्हची सुविधा भाविकांना उपलब्ध करून द्यावी. एकूणच काय तर आजच्या परिस्थितीत गणेशोत्सवाचे पर्यावरणस्नेही स्वरूप जपणे ही नागरिकांची प्राथमिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी आपल्या जबाबदारीचे वहन करून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे आणि गणेश मूर्ति खरेदी करताना विक्रेत्यांना आवर्जून सांगावे की, “बाप्पा मला मातीचाच हवा !”
- स्वप्नील भोगेकर