Top News

गावाच्या भल्यासाठी झटणारा संवेदनशील माणूस विलासराव मोगरकार #chandrapur #pombhurna


गावाच्या भल्यासाठी झटणारा संवेदनशील माणूस विलासराव मोगरकार यांचा आज वाढदिवस...
..गाव, गावाचा विकास,गावातील आपली माणसं,असा साधा सरळ विचार करणारा एवढंच नव्हे तर गावाच्या भल्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी झटणारा संवेदनशील माणूस विलासराव आबाजी मोगरकार.चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द‌‌‌ या छोट्याशा गावातील हे व्यक्तीमत्व त्यांना कोणत्या परिचयाची गरज नाही.समाजकार्य, राजकारण,आंदोलक, झुंजार नेता, कवी, निसर्गप्रेमी,पशूप्रेमी, प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट वादक,गायक,कलावंत असं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्यांची अनेक कामे त्यांची वेगळी ओळख सांगणारी आहे.
विलासराव देवाडा खुर्द‌‌‌ येथील सरपंच आहेत.ते सरपंच म्हणून सलग दुसऱ्यांदा ते खुर्चीवर विराजमान झाले आहेत. आश्चर्य हेच की ज्या माणसाला कधी राजकारणात यायचे नव्हते त्यांनी फक्त आणि फक्त गावाचं ऋण फेडण्यासाठी,समाजाला काही तरी देणं असतं या शुद्ध भावनेतूनच ते गावातील राजकारणात सक्रिय झाले.आणि आज ते गावातील राजकारण समर्थपणे सांभाळत आहेत.
विलासराव आपल्या गावात लोकल साधनातून ग्लोबल प्लेटफार्म तयार करीत आहेत. त्यांचा दुरदृष्टीचा विचार फार ग्लोबल आहे. त्यांनी गावाचा चेहरामोहरा अंतर्बाह्य बदलवून टाकला. केवळ बाह्य रूप नाही तर लोकांच्या मनातील भेदाभेदाची घाणही त्यांनी काढून टाकली.देवाडा खुर्द येथील गावकऱ्यांचा विलासरावांच्या कार्यकुशलतेच्या समीकरणावर विश्वास आहे.त्यावेळी विलासरावांची कुणाला फारशी ओळख नव्हती मात्र आज तालुक्यात असलेली त्यांची ओळख न् भुतो न् भविष्य आहे. तालुक्यातल काही मोजके लोकप्रिय असलेल्या लोकांच्या सुचीमध्ये विलासरावांचंही नाव नक्कीच आहे. हि मिळकत त्यांना सहज मिळाली नाही. लोकप्रियता तशी सहज मिळत नाही. तावून, सुलाखून बाहेर पडावं लागतं तेव्हाच ते लोकप्रियतेचं सुर गवसतो. विलासरावांचं आयुष्य तसं खाचखडग्यानं भरलेलं.‌ घरात दारिद्र्य पण शिकण्याची त्यांची जिद्द म्हणूनच गावात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी माध्यमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचं शिक्षण पोंभूर्ण्यातून घेतलं. शिक्षण घेतांना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी मात केलंच.शिक्षण घेतांना त्यांनी रोजगार हमीचेही कामं केले,शेतमजूरी केली. पुढे १२ वी नंतरच शिक्षण घेता आलं नाही हि खंत विलासरावांना आजही आहे. त्यांनी ‘लोकमत’ वर्तमानपत्राची एजेन्सी घेतली आणि तालुका वार्ताहर म्हणून कामही सुरू केले.पुढे त्यांनी लोकसत्ता मध्येही काम केले. यावेळी त्यांनी धानाचा व्यवसाय सुरू केला. यात त्यांचा व्यावसायीक जम बसला.
विलासरावाची देवावर फार मोठी श्रद्धा आहे.ते नित्यनेमाने पुजा पाठ करतात. त्यामुळेच ते अत्यंत शांत स्वभावाचे आहेत. विलासरावांच्या नसनसात भारतीय काॅंग्रेस पक्षाची विचारधारा रूजून आहे. देवाडा खुर्द‌‌‌ येथे भारतीय मार्क्सवादी पक्षाच्या आंदोलन,चळवळीमुळे भारतीय मार्क्सवादी पक्षाच्या विचाराचा मोठा पगडा त्यांचेवर पडला. १९९५ मध्ये ते कार्यकर्ते म्हणून समोर आले. चळवळीमध्ये ते सक्रीय राहिले. १९९५ मध्ये त्यांनी खऱ्या आदिवासींना वन जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून मोठे आंदोलन उभारले होते. त्यांच्या या आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालिन महासचिव काॅम्रेड अर्धेन्दु भूषण वर्धन(ए.बी.वर्धन), गणपत अमृतकर हे सहभागी झाले होते. त्यांच्या आंदोलनात वर्धन यांच्या सभेमुळे व वर्धन यांच्या प्रेरणेमुळे विलास मोगरकार परिचीत झाले. पुढे हे नाव आंदोलनांमुळे गावाची वेस ओलांडून पुढे गेले, प्रसिद्ध झाले. त्यांच्या कार्याने देवाडा खुर्द गावची सीमा ओलांडली होती. पिपरी दीक्षित या गावच्या एका महिलेच्या न्यायासाठी दिलेला लढा फार मोठा होता. विलासराव आजही तो संघर्ष व त्यांनी दिलेला लढा सांगतात तेव्हा रोमांच उभे होतात.
शिक्षण पूर्ण करता न आल्याची खंत विलासरावांना होती म्हणून आपल्या जवळच्या स्नेही, मित्राच्या सहकार्याने शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ स्थापून आदिवासी आश्रमशाळा सुरू केले. शिक्षण दानाच्या पवित्र कामासाठी त्यांनी आपल्या गावातील लोकांना, स्थानीक लोकांना स्थान दिलं. आज हि शाळा उल्लेखनीय काम करीत आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत. तर काही विद्यार्थी खेळात राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेले आहेत. त्यांच्या या प्रगतीने विलासराव हरखून जातात. त्यांचा अभिमान द्विगूणीत होतो. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांचे योगदान पाहून त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००४ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.एवढंंच नव्हे तर २००७ मध्ये वनराई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत हि पुरस्काराची शृंखला आजमितीस सुरूच आहे.
विलासराव मितभाषी आहेत. शांत स्वभावाचे आहेत.मात्र त्यांच्यात फायटर स्पिरिटही दडली आहे. गावाच्या भल्यासाठी त्यांनी लढलेले एक आंदोलन उल्लेखनीय ठरले. जनावरांच्या चराईसाठी राखीव असलेल्या जागा परिसरातील काही धनदांडग्यांनी बळकावल्या होत्या. त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आणि न्यायालयीन लढाई त्यांनी अतिशय हिंमतीने लढली. त्यांच्या या लढाईला यश मिळाले आणि अशा ५१ धनदांडग्यांचे पट्टे रद्द करून ते ग्रामपंचायतला हस्तांतरीत करण्यात आले. हा लढा अजुनही सुरू असल्याचे ते सांगतात. याविरुद्ध त्यांचा दुसरी बाजू‌ म्हणजे ज्या लोकांनी अनेक वर्षांपासून शेती कसली आहे अश्यांना त्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठीचाही त्यांचा लढा सुरू आहे.
मध्यंतराचा काळ विलासरावांसाठी फार वाईट होता. आणि म्हणूनच वर्ष २००० पासून २०१२ पर्यंत ते नागपुरात राहिले. पण गावाची आठवण, गावाचं ऋण, आपली माणसं, सामाजिक जबाबदारी हे विचार त्यांना तिथे काही स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ते पुन्हा गावच्या मातीत परतले. गावाची दशा पाहून ते अस्वस्थ झाले. गावाचं विकास कसं करता येईल हे विचार सुरू झाले. २०१४ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि त्यात ते जिंकले. पुर्ण बहुमत आल्याने ते सरपंच पदावर विराजमान झाले. ते खरे तर नवखे होते. यादरम्यान जिल्हा परिषद निवडणूका लागल्या ते अपक्ष म्हणून निवडणूक लढली यात त्यांचा पराभव झाला असला तरी ते लक्षवेधी मतं घेतली. तालुक्यात अपरिचीत असलेल्या माणसाला एवढी मत मिळाली याची धास्ती नक्कीच अनेकांना बसली. विलासरावांची हार झाली पण ते थांबले नाहीत.त्यांनी घोडदौड सुरू ठेवली. हि घोडदौड अशीच सुरू आहे.

आदिवासी लोकांशी त्यांची अधिक जवळीक आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते पोहचतात. त्यांच्या न्यायहक्कासाठी लढतात. आंदोलनात भाग घेतात. एवढंच काय तर त्यांच्या सुख दुःखातही भाग घेतात. आज आदिवासी लोकांनी त्यांना आपलंसं केलं आहे. हि खरं तर धनसंपदा त्यांच्या कर्तुत्वाने मिळाली आहे. एन.टी. , व्हि.जे.एन.टी. यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. नाथजोगी समाज विलासराव यांना प्रचंड मानतो. विलासरावही त्यांच्या सोबत असतात.या समाजातील प्रत्येकांशी घरोब्याचे संबंध आहेत.
विलासराव प्रगतशील शेतकरी आहेत.ते आधुनिकतेची जोड देत पारंपरिक शेती करतात. पारंपरिक शेतीत सेंद्रिय शेती करतात. ते वेगवेगळे पिके घेतात यात रासायनिक खतांचा कोणताही वापर करत नाहीत. फळझाडांच्या शेतीचा ही यात समावेश आहे. त्यांना झाडांविषयी ज्ञान आहे. घरी वेगवेगळ्या प्रजातीची त्यांनी झाडं लावली आहेत. त्यांची चांगली जोपासना ते करतात. सकाळी दिड ते दोन तास वृक्षांसाठी देतात हे त्यांचे नित्याचे. ते वृक्षप्रेमी आहेत तसे पशुप्रेमीही आहेत. गावात गुरढोरांसाठी कॅम्प आयोजित करणे हे कर्तव्य म्हणून करतात. यामुळेच कि काय पशूंच्या प्रती सद्भावना म्हणूनच ते अनेक दिवसांपासून गोषाला बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून ते गुरांची सेवा करण्याचा त्यांचा संकल्प आहे. ते हे काम नक्कीच करीतल.
लढवय्या विलासरावांचं एक अव्यक्त कोपरा आहे. तो म्हणजे त्यांचं कवी मन. ते कवी आहेत. ते कवितेतून समाजाचे शोषण,संघर्ष,अन्याय,भ्रुणहत्या, लोकचळवळ,मुक्तीचे कवीता करतात. ते आपल्या कवितेतून समाजाची दशा व दिशा उजागर करतात.अन्यायाच्या विरोधात प्रहारही करतात व परखड मते मांडतात. एवढंच काय तर ते आपल्या कवितेतून हळव्या मनाचे शब्दही गुंफतात. तबला, हार्मोनियम वाजविण्याचा त्यांना छंद आहे. ते भजन गायनातून ते अंर्तमनाचा शोध घेतात.छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपीता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले,वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वंदनीय गाडगेबाबा,संताजी जगनाडे महाराज,वीर बिरसा मुंडा, शाहिद वीर बाबुराव शेडमाके हे आदर्श आहेत.
विलासराव कोणत्या सुटा बुटात अडकले नाहीत.किंवा तसा बडेजाव हि करीत नाही. ते साधं आयुष्य जगतात.म्हणूनच ते सामान्य माणसासोबत असतात. आणि हा साधं आयुष्य जगणारा माणूस सामान्य माणसासोबत नेहमीच उभा असतो.काही कुणाला अडचण पडली,कुठे कुणाचं अडलं,कुणाला कशाची गरज पडली,कुणाचं काही वाईट झालं तर विलासराव नेहमीच पुढे असतात. लोकांना वाटावं साहेब माझा पाठीराखा आहे हि भावना त्यांच्या मनात असते. साहेब म्हणून विलासराव परिचीत आहेत.
सामान्य लोकांशी व गावांशी नाळ जुळलेली असलेला अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा संवेदनशील माणूस म्हणजे विलासराव मोगरकार.

अश्या ग्रेट पर्सनालिटीचा आज ०७ सप्टेंबर ला वाढदिवस.

विलासराव मोगरकार यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा....

आपल्या जीवनासाठी सुखासाठी आयुष्यासाठी आरोग्यासाठी सुख-समृद्धीसाठी यशासाठी खुप खुप शुभेच्छा....

- सुरज गोरंतवार,
- पोंभूर्णा
- ९८३४४०६६७३

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने