नागभीड:- नागभीड तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या चार वर्षांच्या निरागस चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागभीड तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे युवक हा पीडित बालिकेच्या कुटुंबातील नात्याने मेव्हणा लागत होता. नातेवाईक असल्याने त्याचे पीडितेच्या घरात नेहमीच येणे-जाणे होते. १७ मे रोजी या नराधमाने चिमुकलीच्या निरागसतेचा फायदा घेतला. तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून गावातीलच एका नवीन सुरू असलेल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
या भयानक प्रसंगानंतर घाबरलेली चिमुकली जेव्हा रडत रडत घरी पोहोचली, तेव्हा तिने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. चिमुकलीची आपबिती ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी तात्काळ नागभीड पोलीस स्टेशन गाठून या युवकाविरोधात तक्रार दाखल केली.
नागभीड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह कडक अशा 'पोक्सो' (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत युवकाला याला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Social Plugin