Three girls drowned to death: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू


उरण:- शनिवारी दुपारी जासई गावातील तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याची खोली लक्षात न आल्याने बुडून मृत्यू झाला. एकाचवेळी तीन निष्पाप जीव गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी दुपारी २ ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हरियाणा रमजान परवीन (वय ८ वर्षे), रवीना रमजान परवीन (वय ७ वर्षे) आणि सौम्या कन्हैया प्रजापति (वय १३ वर्षे) या तिघी जासई गावातील तलावात अंघोळीसाठी उतरल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात गेल्या आणि बुडाल्या.


यावेळी आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. तिघींनाही पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मयत तिन्ही मुली जासई गाव, उरण येथील इस्माईल यांच्या चाळीत राहत होत्या. त्या मूळ उत्तर प्रदेशच्या रहिवासी होत्या.


या घटनेची नोंद उरण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे पाठविण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.