आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नाही:- प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्र:- “इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही, देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा”, असं मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
दादर येथील इंदूमिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यात येणार असून त्याची पायाभरणी काल (18 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होती. मात्र, या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच इतर नेत्यांना बोलवण्यात आले नसल्याने हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला.
याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र, आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा, असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
रामदास आठवले यांची नाराजी
तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी आंबेडकर समाजातील नेत्याला महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले नाही यावर आमची नाराजी असल्याची उघड भूमिका रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली. महाराष्ट्र सरकार पायाभरणीवरुन राजकारण करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही त्यावेळी उपस्थित होते.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आनंदराज आंबेडकर आक्रमक झाले आहेत. याआधी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू, असं मत व्यक्त केलं होतं.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असेल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट असेल. या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. तसेच स्मारकाचा चबुतरा 100 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.
स्मारकाच्या निधीतही 400 कोटींची वाढ केली असून आता एकून 1100 कोटी निधी करण्यात आला आहे. तसेच या स्मारकाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. त्यासोबतच स्मारकात एक मोठं ग्रंथालयही असणार आहे. विशेष म्हणजे येथे चवदार तळ्याची प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.
पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे आणि लोखंडाचे प्रमाण वाढेल. तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय आणि प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.
या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.