सावली:- ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्रातील लोकप्रिय नेते संदीप गड्डमवार यांनी आज दिनांक 23 डिसेंबर ला मुंबई येथे दुपारी ०१ वाजता महाराष्ट्र कांग्रेस भवन येथे कांग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रपुर जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार, महिला बाल कल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये कांग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केले.
यावेळी त्यांचा सोबत चंद्रपुर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, रवींद्र शिंदे, राकेश रत्नावार, दिनेश चिटनूरवार, निखिल सुरमवार उपस्थित होते.
कोण आहेत संदीप गड्डमवार?
संदीप गड्डमवार हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक आहेत. ब्रम्हपुरी मतदारसंघातून 2009 मध्येही संदीप गड्डमवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र अवघ्या साडेपाच हजारांच्या मताधिक्याने भाजप उमेदवार अतुल देशकर यांनी निवडणूक जिंकली होती.
आधी राष्ट्रवादी, नंतर शिवसेनेकडून उमेदवारी
2014 मध्ये संदीप गड्डमवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र वडेट्टीवारांनी बाजी मारली आणि भाजप उमेदवारानंतर गड्डमवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर गड्डमवार यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पुन्हा मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात लढवली. पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. परंतु पुन्हा त्यांना पराभवाचा धक्का बसला.
“विदर्भच काँग्रेसला राजकीय दिशा देईल”
संदीप गड्डमवार यांच्यासह रवींद्र शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. “आमच्याविरोधात लढणारे पक्षात येत आहेत, हे राजकीय समीकरण चांगलं आहे. विदर्भात काँग्रेसचा प्रभाव वाढत आहे आणि विदर्भच काँग्रेसला पुढची राजकीय दिशा देईल” असं वडेट्टीवार पक्षप्रवेशावेळी म्हणाले. विजय वडेट्टीवार हे सलग दोन वेळा चंद्रपुरातील ब्रम्हपुरी मतदारसंघातून आमदार राहिले आहेत.
तर राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं…
“काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते घरवापसी करत आहेत. राष्ट्रीय विचारधारा पाळणारा पक्ष म्हणून काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 40 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या उमेदवारांना त्यावेळी ताकद मिळाली असती तर कठीण काळातही काँग्रेस तरली असती. राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं. पण आता पक्ष वाढवायचा आहे. आागामी महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करा” असे आदेश बाळासाहेब थोरात यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.