पोलिस वाहनाने रुग्णालयात पोहोचवताच दिला गोंडस बाळाला जन्म.
भामरागड (जि. गडचिरोली):- नक्षलवाद्यांसोबत झुंज देतानाच गडचिरोली पोलिस विभाग जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना मदतीचा हातसुद्धा देत असतो. याचाच प्रत्यय तालुक्यातील परायनार येथील गावात आला. वाहनाअभावी रुग्णालयात जाणे अशक्य झालेल्या गर्भवती महिलेच्या मदतीला पोलिस अक्षरश: देवदूत होऊन आले. तिला वाहनासह सर्व प्रकारची मदत दिल्याने या महिलेची प्रसूती सुखरूप होऊ शकली आणि तिने गोंडस बाळाला जन्म दिला. नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील परिसरात पोलिस पथक सातत्याने गस्त घालत असते.
येथील धोडराज पोलिस मदत केंद्रातील पोलिस जवानांचे पथक अशाचप्रकारे गस्त घालत असताना परायनार गावातील महिला सरिता मंगेश महाका (वय 22) ही गर्भवती असून तिला कोणतीही मदत मिळत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गाव गाठून अधिक माहिती जाणून घेतली असता सरिता महाका ही गर्भवती असून तिला नऊ महिने पूर्ण झाल्याचे कळले. पण, ती रुग्णालयात जायला तयार नव्हती. तेव्हा धोडराज पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दुधाळ, पोलिस अंमलदार मानकर, नैताम, कळंबे, मडावी, कोडापे, ढोरे, पवार, परतेती, कोकाटे, शेप, चव्हाण तसेच राज्य राखीव पोलिस दलाचे अंमलदार सुलाने, नागरगोडे, शिरसाट, देशमुख, सुरवसे यांनी तिच्या नातेवाईकांच्या मदतीने तिची समजूत घालत रुग्णालयात जाण्यास तयार केले. त्यानंतर तिचा पती मंगेश महाका तिला रुग्णालयात नेण्यास तयार झाला. पण, वाहनाचा प्रश्न होता. त्यांनी पोलिसांना कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी तत्काळ धोडराज येथील खासगी चारचाकी वाहनाची व्यवस्था करून दिली. या वाहनाने सरिता महाका हिला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयात नेण्यात आले. येथे तिला वेळीच औषधोपचार मिळाल्याने सरीताची प्रसूती सुलभ होऊन तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आईची व बाळाची प्रकृती चांगली आहे. पोलिसांनी वेळेवर मदत केली नसती, तर नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या सरिता महाकाच्या आणि तिच्या बाळाच्या जिवाला धोका होण्याची शक्यता होती. पण, ऐनवेळेवर पोहोचत पोलिसांनी मदत केल्यामुळे तिची प्रसूती सुखरूप होऊन तिला या जगात नवा जीव जन्माला घालता आला. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तत्काळ केलेल्या मदतीबद्दल महाका दाम्पत्याने पोलिस विभागाचे आभार मानले असून पोलिसांच्या या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अष्टपैलू विभाग:-
खरेतर सरकारच्या मदतीसाठी सरकारचे अनेक विभाग आहेत. पण, यातील बहुतांश विभाग सुस्त आहेत. त्यामुळे पोलिसांनाच अनेकदा या विभागांची कामे करावी लागतात. कधी पोलिस ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून कामगारांसारखे रस्ता बांधत सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतात, कधी गावातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व इतर सरकारी दाखले उपलब्ध करून देत प्रशासकीय विभागाची जबाबदारी सांभाळतात, तर कधी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत कृषी, समाजकल्याण, उद्योग आदी विभागांचीही धुरा वाहतात. त्यामुळे पोलिस विभाग खऱ्या अर्थाने अष्टपैलू विभाग आहे.