(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- शिवारात वाघोबा आल्याची माहिती मिळाली. वनकर्मचारी, वनमजूरांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वनकर्मऱ्यांच्या सोबतीला दहा ते पंधरा गावकरी होते. वाघाचा शोध सुरू होता. याच दरम्यान मधमाश्यांनी हल्ला केला. धावाधाव सुरू झाली. मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी काहींनी नदी पात्रात उडी घेतली. धावपळीत काही जमिनीवर कोसळले. तर मधमाश्यांनी अनेकांना चावा घेतला. या साऱ्या प्रकारात वन कर्मचाऱ्यांसह २० गावकरी किरकोळ जखमी झालेत. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी गावाजवळ असलेल्या बेटावर रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
हेही वाचा:- अपघातात पंचायत समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते संजय मारकवार यांचे दुःखद निधन.
https://www.adharnewsnetwork.com/2020/12/blog-post_52.html?m=1 गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकऱ्यांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा संगमाजवळ पोहचला. तिथून वनकर्मचाऱ्यांनी नावेने प्रवास करीत बेट गाठले. आठ वनकर्मचारी आणि बेटावरील दहा ते पंधरा शेतकऱ्यांचा टिमने वाघाचा शोध सुरू केला.
हेही वाचा:- गर्भवती महिलेसाठी पोलिस बनले देवदूत.
शोधाशोध सुरू असताना दुपारच्या सुमारास बेटावरील एका झाडावर असलेल्या मधमाश्यांनी शोध घेणाऱ्या टिमवर हल्ला केला. मधमाश्यांचा हल्ला होताच टिममधील सदस्यांची धावाधाव सुरू झाली. धावताना अनेकजण जमिनीवर पडल्याने किरकोळ जखमी झाले. मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी काहींनी नदीपात्रात उडी घेतली. तरीही मधमाश्यांनी अनेकांना चावा घेतला. टिममधील जवळपास सर्वच सदस्य जखमी झालेत.
वाघ दिसला नाही मात्र मधमाश्यांनी दिलेल्या जखमा घेऊन वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी घाबरून घराचा रस्ता पकडला.
वाघ गेला कुठे?
शिवणी गावाजवळील बेटावर असलेल्या शेतशिवारात अनेकांना वाघ दिसला. हा वाघ तिथे कसा आला? त्याने कुणाची शिकार केली का? येथून तो कुठे गेला? या प्रश्नांचे उत्तर मिळू शकले नाही. वनकर्मचारी वाघाचा शोध घ्यायला गेले. मात्र मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे त्यांनाही तसेच परतावे लागले.
शिवणी परिसरात वाघ आल्याची माहिती मिळाली. दोन वनरक्षक आणि वनमजुरांची टिम शोधाशोध करीत असताना मधमाश्यांनी हल्ला केला. काही किरकोळ जखमी झालेत.
एस.जे.बोबडे,
वनपरिक्षेत्राधिकारी, धाबा.