Guinness World Records : कोळसा आणि वाघांचा जिल्हा आता 'लावणी'साठी ओळखला जाणार!

Bhairav Diwase
चंद्रपूरच्या लेकींनी 'गिनीज बुक'मध्ये कोरलं नाव!
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा आता केवळ कोळसा आणि वाघांसाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा झेंडा जागतिक स्तरावर फडकवण्यासाठी सज्ज झाला होता! आज चंद्रपूरच्या भूमीत एक असा चमत्कार घडला आहे, ज्याची नोंद थेट 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये झाली आहे. आधीचा रेकॉर्ड 1326 महिलांचा होता. आज 2432 महिला आणि मुलींनी प्रत्यक्ष पूर्ण वेशात लावणी केली आणि रेकॉर्ड झाला.

महाराष्ट्राची लोककला, आपली अस्मिता असलेल्या 'लावणी' नृत्याचा जागर आता सातासमुद्रापार गेला आहे. उत्कृष्ट महिला मंच, चंद्रपूर आणि मुख्य प्रायोजक सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या वतीने एका अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

तब्बल ३००० महिला आणि मुली एकाच वेळी, एकाच तालावर आणि एकाच उर्जेने पाऊल रोवले. विषय आहे— '२० मिनिटे २० लावण्या'. हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर ही एक शक्ती आहे महिलांच्या एकजुटीची! गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या रणरागिणी भर उन्हात घाम गाळून सराव करत होते. आज दुपारी ४ वाजल्यापासून चंद्रपूरचे चांदा क्लब मैदान या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले आहे.


या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ व्यावसायिक कलाकार नाहीत, तर गृहिणी, विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांचाही तितकाच मोठा सहभाग आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला आधुनिकतेची आणि विक्रमाची जोड देण्याचा हा 'उत्कृष्ट महिला मंच'चा प्रामाणिक प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.