चंद्रपूर:- ज्या आदिवासी भागात दशकानुवर्षे बंदुकीच्या धाकात विकास रोखून धरला गेला, हजारो नागरिकांचे आणि पोलीस जवानांचे बळी गेले, त्याच चळवळीतील एका कुख्यात माजी नक्षलवाद्याची आता विद्यापीठाच्या 'एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात' समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण विदर्भात आणि नक्षलग्रस्त भागात संतापाची लाट उसळली आहे.
नुकतीच गोंडवाना विद्यापीठाने एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्राच्या कामासाठी तीन समन्वयक नेमण्याचा निर्णय घेतला. यात डॉ. सतीश गोगलवार आणि डॉ. नरेश मडावी यांच्यासह आत्मसमर्पित नक्षलवादी मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ 'भूपती' याची निवड करण्यात आली. भूपती हा तोच व्यक्ती आहे, ज्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सीपीआय (माओवादी) चा पोलिटब्युरो सदस्य आणि कुख्यात नक्षल नेता होता.
या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेत 'आदिवासी टायगर सेनेने' आक्रमक भूमिका घेतली आहे. आदिवासी टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली आहे.
"ज्या व्यक्तीने ४० वर्षे आदिवासींना विकासापासून दूर ठेवले, अनेक माता-भगिनींना विधवा केले, हजारो युवकांचे जीवन उद्ध्वस्त केले, त्याच व्यक्तीला आता थेट ग्रामसभेचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी कशी दिली जाऊ शकते?" असा सवाल आदिवासी टायगर सेनेने उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर, या नक्षल नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याऐवजी त्याला पुन्हा ग्रामसभा समन्वयक बनवून आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा हा डाव तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.
आदिवासी टायगर सेनेचे विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, विदर्भ महासचिव देवेंद्र उईके, उपाध्यक्ष अमोल कुळमेथे, प्रवक्ता मोरेश्वर उईके आणि प्रा. हितेश मडावी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, माजी नक्षली भूपतीची ही नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या डोक्याच्या उपचारासाठी गडचिरोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत 'भीक मांगो' आंदोलन छेडण्यात येईल.

