चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. राजुरा न्यायालयाच्या अगदी समोरच दोन अज्ञात इसमांनी भरदिवसा गोळीबार करत एका तरुणाला गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पापा ऊर्फ विनोद जाधव यांच्यावर अचानक गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच न्यायालय परिसरात प्रचंड धावपळ उडाली. या हल्ल्यात विनोद जाधव यांच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले, तर हल्लेखोर घटनास्थळावरून लगेच दुचाकीवरून पसार झाले.
गंभीर जखमी झालेल्या विनोद जाधव यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.
न्यायालयासारख्या संवेदनशील आणि गजबजलेल्या परिसरासमोरच घडलेल्या या थरारक घटनेमुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर ताब्यात घेतला असून नाकाबंदी करण्यात आली आहे. गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट असून, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला आहे का, याचा तपास राजुरा पोलीस करत आहेत.
