नागपूर:- नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री लोक गाढ झोपेत असताना भयंकर दुर्घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास जलशुद्धीकरण प्रकल्पात अचानक क्लोरिन वायूच्या भीषण गळती झाली. यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली.
या विषारी वायूच्या प्रभावामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागल्याने प्रकल्पातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसह सुमारे ४० जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात ही गॅस गळती झाली. वायू गळती सुरू होताच प्रकल्पातील ८ ते १० कर्मचाऱ्यांना आणि आसपासच्या परिसरातील २० ते २५ नागरिकांना अचानक गुदमरल्यासारखे होऊन श्वसनाचा गंभीर त्रास सुरू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व बाधित नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासनासह एनडीआरएफचे पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.जवळपास २०० मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला असून नागरिकांना तातडीने स्थलांतरीत करण्यात आले आहे.
