Sugar prices risen: सणासुदीच्या तोंडावर गोड साखर झाली 'कडू'

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
ऐन सणांच्या तोंडावर बाजारात साखरेचा कडवटपणा वाढला आहे. चंद्रपूरच्या बाजारपेठेत साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाली असून, दर थेट ७२ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.


चंद्रपूर शहरात साखरेच्या भावात झालेली ही दरवाढ सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी दोघांचीही झोप उडवणारी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी ४० ते ५० रुपये प्रति किलो मिळणारी साखर आता थेट ७२ रुपये किलो विकली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारातील ही परिस्थिती एखाद्या शेअर बाजारासारखी झाली आहे—सकाळी एक दर तर दुपारी दुसराच दर पाहायला मिळत आहे. या अचानक झालेल्या २० ते २५ रुपयांच्या दरवाढीमुळे ग्राहक तर संतप्त आहेतच, पण दुकानदारही ग्राहकांशी व्यवहार करताना संभ्रमात पडले आहेत.


विशेषतः रोजमजुरी करणाऱ्या आणि भांडी घासून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या गरीब महिलांना या महागाईचा मोठा फटका बसत आहे. सणांच्या काळात लाडू, पेढे आणि विविध गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरेची मोठी गरज असते; मात्र वाढलेल्या दरांमुळे गरिबांच्या ताटातील गोडवा हिरावला गेला आहे. वाढत्या किमतींमुळे ग्राहक व्यापाऱ्यांकडे संशयाने पाहत असल्यामुळे दुकानदारांनाही मोठे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.


ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या या 'कडू' घोटामुळे गृहिणींचे बजेट पार विस्कळीत झाले आहे. आता या अचानक झालेल्या दरवाढीवर प्रशासन आणि राज्य सरकार काय कारवाई करते आणि सर्वसामान्यांना दिलासा कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.