Ramnagar Police: चंद्रपुरात फार्महाऊसवर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक!

Bhairav Diwase
१६ जणांना बेड्या, ४७.६४ लाखांच्या मुद्देमालासह जप्त
चंद्रपूर:- रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बोर्डा गावातील 'भूमी फार्महाऊस'वर पोलिसांनी मोठी कारवाई करत हाय-प्रोफाईल जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी फार्महाऊस चालकासह तब्बल १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून ऐन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलिसांनी तब्बल ४७ लाख ६४ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


बोर्डा येथील भूमी रेस्टहाऊस/फार्महाऊसमध्ये काही लोक बेकायदेशीरपणे हार-जीतचा जुगार खेळत आणि खेळवून घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम आणि त्यांच्या शोध पथकाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास या फार्महाऊसवर अचानक धाड टाकली.


या कारवाईदरम्यान फार्महाऊसवर जुगार खेळणारे आणि खेळविणारे १५ जण, तसेच जुगार अड्डा चालवणारा हॉटेल चालक शामराव व्यंकटेश आनंदवार (रा. हनुमान नगर, तुकुम, चंद्रपूर) हा रंगेहाथ पकडला गेला.


पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी येण्या-जाण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने व साधने असा एकूण ४७,६४,०९० रुपये (४७ लाख ६४ हजार ९० रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींवर रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०१४/२०२६, कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, स.पो.नि. शिवाजी नागवे, स.पो.नि. हनुमान उगले, पो.उ.नि. कृष्णा दराडे यांच्यासह पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मिलींद दोडके, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, ब्ल्युटी साखरे, सुरज शेडमाके, मंगेश शेंडे, कुमोद खनके, संदिप भोयर, संजू देशीवाले, संदेश चुनारकर, सतिष डांगे आणि राकेश पिंपळकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.