Chimur News: बंदराचा पाठलाग करताना डीपीवर चढलेल्या बिबट्याचा विद्युत प्रवाहाने घेतला जीव

Bhairav Diwase

चिमूर:- 
चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शंकरपूर उपवनक्षेत्रातील वगाडपेठ (पिंपळगाव खदान) परिसरात विजेचा तीव्र धक्का लागल्यामुळे एका तीन वर्षीय मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हा बिबट्या एका बंदराचा (वानराचा) पाठलाग करत होता. शिकारीच्या नादात हा वन्यजीव पिंपळगाव खदान परिसरातील एका विद्युत रोहित्र्यावर (Electric DP) चंचळपणे चढला. मात्र, तिथेच विजेचा प्रवाह लागल्याने या मादी बिबट्याला तीव्र शॉक बसला, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या घटनेत ज्या बंदराचा पाठलाग बिबट्या करत होता, त्या बंदराचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 


या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक आमोद गौरकर, वनपाल राजेंद्र मेश्राम तसेच इतर वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याचे काम सुरू असून याप्रकरणी पुढील कायदेशीर व विभागीय तपास केला जात आहे.