चंद्रपूर:- दिवाळीचा सण... सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण... मात्र याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना नेते मुकेश जिवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्रिशूल आंदोलन प्रकरणी झालेल्या या कारवाईवर जिवतोडे यांनी पोलिस प्रशासनावर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
वरोरा परिसरातील स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी वेकोली प्रशासनाविरोधात त्रिशूल आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान आवाजाचे नमुने देण्यासाठी पोलिसांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची सूचना केली होती.
मात्र, दिवाळीचा सण असल्याने दिवाळीनंतर उपस्थित राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती मुकेश जिवतोडे यांनी पत्राद्वारे पोलिस प्रशासनाकडे केली होती. असे असतानाही दिवाळीच्या दिवशी घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, भाऊबीजेसाठी त्यांची बहीण घरी आलेली असतानाच ही कारवाई करण्यात आल्याचे जिवतोडे यांनी सांगितले.
या कारवाईनंतर मुकेश जिवतोडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून, आमच्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्वसामान्य बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे हा काय गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी झालेल्या या पोलिस कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही नियमित तपास प्रक्रियेचा भाग असलेली कारवाई होती की यामागे राजकीय दबाव होता? या आरोपांवर पोलिस प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


