Chandrapur Fire News : चंद्रपुरातील बालाजी वॉर्डात आगीचा थरार!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
दिवाळीच्या फटाक्यांमुळे चंद्रपुरात मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात फटाक्याची ठिणगी थेट एका घराच्या दुसऱ्या माळ्यावर पडल्याने भीषण आग लागली. या आगीत घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजेच्या सुमारास बालाजी वॉर्डातील किशोर भामकर यांच्या घराबाहेर लहान मुले फटाके फोडत होती. याचदरम्यान एका फटाक्याची ठिणगी उडून थेट त्यांच्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर पडली. त्यामुळे काही वेळातच तेथील साहित्याने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.

घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

या घटनेत दुसऱ्या माळ्यावरील साहित्याचे नुकसान झाले असले, तरी घरातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून बालाजी वॉर्डातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.