चंद्रपूर:- चंद्रपुरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंबाखू वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना देणाऱ्या दोन कथित खबऱ्यांनीच संबंधितांकडे तीन लाख रुपयांची खंडणी आणि दरमहा ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी तब्बल २० लाख ६२ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला असून, खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. समीर अब्दुल कादिर कुरेशी आणि वसीम अख्तर झिमरी हे दोघे एमएच ३४ सीक्यू ३३९२ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून होला, ईगल, क्रेझ आदी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रामनगर पोलिसांनी सावरकर चौक येथे सापळा रचला. यावेळी वाहनातून २० लाख ६२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला. याप्रकरणी रामनगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील माहिती देणारे इरफान रफीक शेख आणि अरबाज महेबूब शेख यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक तपास केला. त्यावेळी या दोघांनी १ नोव्हेंबर रोजी अजयपूर येथे तंबाखू वाहतूक करणारे वाहन अडवून वाहन पोलिसांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून तीन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच पुढील व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याची मागणी करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी इरफान रफीक शेख आणि अरबाज महेबूब शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

