Gadchiroli News : प्रेमभंगातून तरुणीची आत्महत्या; महिला-पुरूष पोलिसांना अटक

Bhairav Diwase

गडचिरोली:-
पोलीस भरतीची तयारी करताना जुळलेली मैत्री, मैत्रीचे प्रेमात रूपांतर आणि त्यानंतर लग्नापर्यंत पोहोचलेले स्वप्न... मात्र या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि प्रेमासह विश्वासालाही तडा गेला. या मानसिक धक्क्यातून एका तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात तब्बल ५२ दिवसांनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून, प्रियकर असलेल्या पोलीस शिपायासह एका महिला पोलीस शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावातील एका तरुणीने पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून गडचिरोली येथे सराव सुरू केला होता. लांझेडा परिसरात ती भाड्याच्या खोलीत राहत होती. याचदरम्यान इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची ओळख शिवकुमार छोटेलाल करसायल (वय २८, रा. टेमली, ता. कोरची) याच्याशी झाली. शिवकुमारही पोलीस भरतीची तयारी करत असल्याने मैदानावर दोघांची जवळीक वाढली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.


दरम्यान, शिवकुमारची पोलीस भरतीत निवड झाली; मात्र तरुणीला यश मिळाले नाही. शिवकुमारची नियुक्ती किटाळी येथील कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये झाली. तरुणी गावाकडे परतली, मात्र दोघांमधील प्रेमसंबंध कायम होते. भविष्यात आपणही पोलीस मध्ये भरती होईल आणि शिवकुमारसोबत लग्न होईल, अशी आशा तिने बाळगली होती.


तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री अन् नात्यात दुरावा!

मात्र, याच काळात शिवकुमारची ओळख गडचिरोली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपाई अश्विनी राऊत (वय २६, रा. बोडधा, ता. देसाईगंज) हिच्याशी झाली. त्यानंतर शिवकुमार तरुणीपासून दूर जाऊ लागला. लग्नासही नकार दिल्याने तरुणी मानसिक तणावात गेली. याचदरम्यान महिला पोलीस शिपाई अश्विनीने तरुणीला फोन करून अपमानास्पद भाषेत बोलल्याचा आरोप आहे. या सर्व घटनांमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणीने ७ सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ठरली महत्त्वाची!

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने आपल्या मनातील वेदना आणि घडलेला घटनाक्रम चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे समोर आले. तरुणीच्या आईनेही पोलिसांत तक्रार दाखल करत आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख केला आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या तक्रारीची आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर कुरखेडा पोलिसांनी आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली पोलीस शिपाई शिवकुमार करसायल आणि महिला पोलीस शिपाई अश्विनी राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. तब्बल ५२ दिवसांनंतर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव करीत आहेत.