ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील चांदगाव येथे चार वर्षीय मयंक अशोक वलके या बालकावर वाघिणीच्या पिल्लाने हल्ला केला. या घटनेत मयंक जखमी झाला असून, त्याच्या चुलत भावाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदगाव येथील रोहित वलके हे गावातीलच आपल्या आत्याच्या घरी जात होते. त्यांच्यामागे चार वर्षीय मयंकही येत होता. यावेळी आत्याच्या घराच्या पायरीवर पोहोचताच वाघिणीच्या पिल्लाने मयंकवर हल्ला केला.
मयंकच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रोहित यांनी मागे वळून पाहिले असता, वाघिणीचे पिल्लू मयंकवर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रोहित यांनी तातडीने प्रसंगावधान राखत मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे वाघिणीच्या पिल्लाने तेथून पळ काढला आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मात्र, या हल्ल्यात चार वर्षीय मयंक जखमी झाला. त्याला तातडीने ब्रम्हपुरी येथील क्रिस्टानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही घटना आज सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी ए. आर. कन्नमवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी बालकाची भेट घेतली. तसेच पोलीस प्रशासनानेही रुग्णालयात भेट देऊन घटनेबाबत चौकशी सुरू केली आहे.

