ACB Chandrapur : 40 हजारांची लाच घेताना कृषी सहाय्यक रंगेहात जाळ्यात

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोरपणा येथील कृषी सहाय्यकाला ACB च्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 27 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आली. हरी विठ्ठलराव उदगीरे असे आरोपी कृषी सहाय्यकाचे नाव आहे. ते कोरपणा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय तक्रारदाराने केलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला 55 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीअंती 40 हजार रुपये स्वीकारण्याचे आणि उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे ठरल्याची माहिती आहे.


तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला. या सापळ्यात आरोपी हरी उदगीरे याने तक्रारदाराकडून 500 रुपयांच्या 80 नोटांच्या स्वरूपात 40 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी ACB पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान आरोपीकडून विव्हो कंपनीचा मोबाईल फोन आणि 595 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक श्री. केदार करीत आहेत. ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मुपडे आणि वर्धा ACB पथकातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

दरम्यान, शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.