चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाचा ‘जय भवानी दांडिया उत्सव’ रद्द करून त्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर गरजू शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ‘जय भवानी दांडिया उत्सव’ यावर्षी रद्द करण्यात आला असून, या उत्सवासाठी होणाऱ्या खर्चाऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा त्यांच्या घरी जाऊन ही मदत दिली जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
चंद्रपूर तालुक्यातील मारडा येथील मनीष रघुनाथ माकोडे (वय ४५), नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील मुखरू लक्ष्मण दडमल (वय ६०), वरोरा तालुक्यातील आर्वी येथील विजय कान्होबा तिवाडे (वय ६०) आणि पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा (माल) येथील महेंद्र दिवाकर राऊत (वय ३५) या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, गटनेते राहुल विरुटकर यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

