चंद्रपूर:- सन्मित्र सैनिक शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू असून पालकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील खांबाळा येथील मृत बालक जीवन विलास झरेकर हा विसापूर येथील 'सन्मित्र सैनिक स्कूल'मध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होता. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
बालकाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सायंकाळी ५ वाजता आपल्या मुलाला अगदी हसतखेळत व सुस्थितीत शाळेत सोडले होते. त्यानंतर शाळेतील शिक्षक त्याला सोबत घेऊन आत गेले. मात्र, वडील घरी पोहोचताच त्यांना शाळेतून फोन आला की, त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. काही वेळातच उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी शाळा प्रशासनाकडून देण्यात आली.
पालकांचा गंभीर आरोप व संताप:
"माझा मुलगा आत्महत्या करूच शकत नाही, ही आत्महत्या नसून माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे," असा गंभीर आरोप मृताच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात परिवार आणि संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. ही हत्या आहे की आत्महत्या हे शवविच्छेदनाचा अहवाल आणि पोलीस तपासातच निष्पन्न होईल. सध्या रामनगर पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.

