Chandrapur News: आश्रमशाळेत शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिस्तीच्या नावाखाली वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल केल्याचा गंभीर आरोप पालकांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ट्रिमरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे केस कापण्यात आले. काही विद्यार्थी खेळत असल्याच्या कारणावरून अधीक्षक संतापले आणि त्यांनी नाभिकाला विद्यार्थ्यांचे अयोग्य पद्धतीने व अर्धे केस कापण्याचे निर्देश दिले, असा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. या मनमानी प्रकारामुळे तब्बल शेकडो विद्यार्थ्यांची मानहानी झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.


या प्रकरणी वाढता रोष पाहता, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांनी संबंधित अधीक्षकांना तात्काळ 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. मात्र, केवळ कागदोपत्री नोटीस न बजावता या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.