ब्रम्हपुरी:- घरातील आजारपण, कौटुंबिक अडचणी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदूबाबांचा सुळसुळाट ग्रामीण भागात सातत्याने वाढताना दिसत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, 'तुमच्या नवऱ्याला आणि घराला मरेपट लागली आहे' अशी भीती दाखवून एका भोंदूबाबाने महिलेकडून तब्बल ९८ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी गांगलवाडी येथील रहिवासी संध्या मनोहर मशाखेत्री (वय ३५) यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित भोंदूबाबाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भीती दाखवून ९८ हजारांची लाटली रक्कम:
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भोंदूबाबाने पीडित महिलेला तिच्या कुटुंबावर मोठे संकट ओढावल्याचे सांगत विविध प्रकारची भीती घातली. या अंधश्रद्धेच्या জাळ्यात अडकून महिलेने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. त्यानंतर विविध धार्मिक विधी आणि इतर कारणे सांगून तिच्याकडून वेळोवळी करून घेत तब्बल ९८ हजार रुपये उकळण्यात आले. मात्र, पैसे देऊनही कुटुंबातील समस्या व आजारपण दूर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. अखेर तिने धाडस करून पोलिसांत धाव घेत न्याय मागितला.
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण:
विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी (१९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी) दोन अनोळखी व्यक्ती भिक्षा मागण्याच्या बहाण्याने आल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे गाव परिसरात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हालचालींबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे:
सणासुदीच्या दिवसांत गावागावांत अशा प्रकारे भोंदूबाबा आणि भटके भिक्षेकरी सक्रिय होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे बनले आहे. फसवणूक करणाऱ्या अशा भोंदूबाबांवर कठोर कायदेशीर कारवाई करून या प्रकारांना वेळीच आळा घालावा, अशी संतप्त मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

