Gondpipari MIDC : शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी कशी करता? भाजपला संपवायला निघाले का? मुनगंटीवारांचा पोलिसांना संतप्त सवाल!

Bhairav Diwase

गोंडपिपरी:-
शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी करता तरी कशी? भाजपला संपवायला निघाले का? असा संतप्त सवाल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांना केला आहे. गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित MIDC प्रकल्पाच्या जमीन मोजणीवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुनगंटीवार आणि पोलिसांमधील मोबाईलवरील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित MIDC प्रकल्पावरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पासाठी १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रस्तावित असून, जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असतानाही प्रशासनाकडून जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. चेकबोरगाव आणि धानापूर परिसरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत आपला विरोध नोंदविला.


दरम्यान, धानापूर येथील शेतकरी बालू बोनगिरवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधत घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मुनगंटीवार यांनी थेट घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस शिपायाशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी कशी करता? भाजपला संपवायला निघाले का? असा संतप्त सवाल त्यांनी पोलिसांना केला. या संवादादरम्यान मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी होऊ देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांचा पोलिसांशी झालेला हा मोबाईलवरील संवाद सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच राज्याच्या उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून २२ नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे गोंडपिपरीतील MIDC प्रकल्पाच्या जमीन मोजणीवरून आता शेतकरी आंदोलनासोबतच राजकीय संघर्षही पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.