राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज २१ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत तब्बल ३३ ठिकाणी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. '२२ वर्षे आपुलकीची, सामाजिक जनसेवेची' या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून, या रक्तदान महायज्ञात नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या सातत्यपूर्ण राजकिय व सामाजिक जिवनात नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देत समाजहिताला प्राधान्य दिले आहे. त्यांचा वाढदिवस केवळ औपचारिक सोहळा न ठरता, त्यातून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य घडावे, या उदात्त हेतूने मित्र परिवाराने या महारक्तदान शिबिराचे नियोजन केले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्र आणि क्षेत्राबाहेरही रक्तदान शिबिराचा हा महायज्ञ चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, घुग्गुस, चंद्रपूर,चंदनखेडा गडचांदूर, नारंडा, वनसडी, वरोडा धाबा, तोहोगाव, सिंधी, कढोली, विठ्ठलवाडा, बीबी, जिवती, पाटण, जुमगाव, गोंडपिपरी, कवठाळा देवाडा, विरुर स्टेशन, पाचगाव, नांदा, तळोधी, रामपूर, उपरवाही, बैलमपूर, मांडवा,पारडी, कोरपना, आणि वणी तालुक्यातील वणी, कायर व मुकुळबन अशा ३३ ठिकाणी एकाच वेळी पार पडणार आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीच्या वेळी रक्ताचा तुटवडा भासू नये, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या २२ वर्षांच्या अखंड जनसेवेचा गौरव करण्यासाठी आणि समाजाप्रती असलेले ऋण व्यक्त करण्यासाठी मतदारसंघातील तरुणांनी व नागरिकांनी या ३३ ठिकाणी होणाऱ्या शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला यशस्वी करावे,असे आवाहन आमदार देवराव भोंगळे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.



