चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही नगरसेवक अजहर शेख यांनी शहीद टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी केली. महापालिकेच्या आवारात जयंती साजरी करण्याची मागणी प्रशासनाने फेटाळल्यानंतर अजहर शेख यांनी थेट महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच समर्थकांसह जयंती साजरी केली. यावेळी टिपू सुलतान यांना अभिवादन करून उपस्थित नागरिक, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना पेढे वाटण्यात आले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास नकार दिल्यानंतरही नगरसेवक अजहर शेख यांनी माघार घेतली नाही. २० नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अजहर शेख यांनी आपल्या समर्थकांसह एकत्र येत टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली.
टिपू सुलतान यांची जयंती महानगरपालिकेच्या आवारात अधिकृतपणे साजरी करण्यात यावी, अशी मागणी अजहर शेख यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र, यासंदर्भात शासनाचा कोणताही अधिकृत शासन निर्णय अर्थात जीआर उपलब्ध नसल्याचे कारण देत प्रशासनाने ही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर अजहर शेख यांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टिपू सुलतान यांना अभिवादन करण्यात आले, तर उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
महापालिका प्रशासनाची भूमिका आणि नगरसेवक अजहर शेख यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे परिसरात काही काळ चर्चेला उधाण आले होते.


