नागपूर:- नागपूरमधील बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवतीनगर इथं ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण नागपुरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मनीष प्रल्हाद गणवीर आणि सोनाली मनीष गणवीर असं मयत पती आणि पत्नीचं नाव असून दोघंही गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. दिवाळीला सुट्टी असल्याने दोघंही मागच्या आठवड्यात नागपुरला आले अन् तिथंच त्यांनी आयुष्याची दोर कापली.
मनीष आणि सोनाली यांनी ऑगस्टमध्ये लग्न केलं होतं. दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर हे दोघांचं दुसरं लग्न होतं. ऑगस्ट महिन्यातच कोर्ट मॅरेज करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली, पण हा निर्णय त्यांचा चुकीचा ठरला दोघांमध्ये खटके उडू लागले. मयत मनीष यांचे आई-वडील नातेवाइकांसह बौद्धगया इथं गेले होते. ते मनीष अन् सोनाली यांच्या संपर्कात होते. पण शनिवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला अन् रात्री दोघांनी राहत्या घरी आयुष्य संपवलं.
दरम्यान, या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सुरू आहे. दोघांचा फोन लागत नसल्याने मनीषच्या आईने आपल्या भाच्याला घरी आहे की नाही, हे पाहण्यासाठी पाठवलं होतं. भाच्याला घरी काही दिसलं नाही. बेल वाजवली तरी काही आतून रिस्पॉन्स आला नाही. त्यानंतर तो टिनाच्या शेडवर चढला. दुसऱ्या माळ्यावरील गॅलरीत गेला. खिडकीतून बघितले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना आणि नातेवाईकांना याची माहिती दिली.


