Chandrapur News : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील (Chandrapur Municipal Corporation) काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा एकदा राजेश अडूर (Rajesh Adur) यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha dhanorkar) आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काही दिवसांपूर्वीच घोषित केलेल्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके लागल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या साक्षीने चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचा गटनेता बदलणार नाही, यावर एकमत झालं होतं. मात्र ऐक्याच्या या भूमिकेला आता सुरूंग लागला आहे.

दरम्यान, वर्तमान गटनेते सुरेंद्र अडबाले हे धानोरकर समर्थक आहेत, तर नव्याने नियुक्ती करण्यात आलेले राजेश अडूर हे वडेट्टीवार समर्थक आहेत. सप्टेंबर महिन्यात धानोरकर गटातील 3 नगरसेवक हे वडेट्टीवार गटात दाखल झाले होते, ज्यामुळे वडेट्टीवार गटाकडे बहुमताचा आकडा झुकला होता. मात्र नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी घडवून आणलेल्या ऐक्यामुळे सुरेंद्र अडबाले यांना बदलवलं जाणार नाही, असं एकमत झालं होतं. मात्र वडेट्टीवार गटाने स्वतःकडे बहुमत असल्याचा नागपूर विभागीय आयुक्तांकडे केलेला अर्ज परत न घेतल्याने विभागीय आयुक्तांनी बहुमताच्या आधारावर राजेश अडूर यांची मनपाच्या काँग्रेस गटनेतेपदी नियुक्ती केलीय.

- चंद्रपूर महानगरपालिकेच्या 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले होते.

-वडेट्टीवार-धानोरकर यांच्यात झालेल्या मोठ्या संघर्षानंतर फेब्रुवारी 2026 ला वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.

- मात्र अवघ्या काही महिन्यातच धानोरकर यांनी वडेट्टीवार गटाचे काही नगरसेवक आपल्या गळ्याला लावले आणि 16 जून 2026 ला 16 नगरसेवकांनी एकत्र येऊन सुरेंद्र अडबाले यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. बहुमताच्या आधारावर 21 जुलै 2026 रोजी अडबाले यांच्या नावाची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

-त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा 3 धानोरकर समर्थक नगरसेवक हे वडेट्टीवार गटाच्या संपर्कात आले आणि राजेश अडूर यांनी 29 सप्टेंबर 2026 रोजी 15 समर्थक नगरसेवकांसह गटनेता बदलाचा प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांकडे सादर केला.

-विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्ष झालेल्या सुनावणीत 27 पैकी 15 नगरसेवकांनी अडूर यांच्या बाजूने कौल दिला व आपल्या स्वाक्षऱ्या मान्य केल्या.

-मात्र वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या ऐक्याच्या घोषणेमुळे हा प्रस्ताव परत घेण्यात येईल असं ठरलं

- मात्र हा प्रस्ताव परत न घेण्यात आल्यामुळे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार आज विभागीय आयुक्तांनी बहुमताच्या आधारावर राजेश अडुर यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी घोषणा केली.