Chandrapur News : चंद्रपुरातील यहोवा यिरे पतसंस्थेचा मोठा घोटाळा; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपुरातील यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या आर्थिक घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. आकर्षक व्याजदर आणि कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १ हजार ३३२ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडून सुरू असून, ज्या गुंतवणूकदारांना अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संचालक अपेक्षा स्नेहदिप जोब, अतुल सोपन बन्सोड, दुर्गा गौरंग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी रुषी वासेकर, तेजस्विनी लोखंडे, प्रिती विनोद भिलकर, वैभव गुरुदेव चौधरी, विकास देवराव दुधबळे, यांनी यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची स्थापना २३ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रपुरात करण्यात आली होती. स्थानिक लोकांना एंजट, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यारी यांची नेमणुक संस्थेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर एजंट, व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध आकर्षक बचत आणि गुंतवणूक योजनांची माहिती देत नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.


बचत खात्यावर वार्षिक ४ टक्के, मुदत ठेवींवर ९.७५ टक्के व्याज, तसेच अवघ्या २२ महिन्यांत गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देणाऱ्या योजनांचे आमिष दाखवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय युवा बचत धन योजना, बचत धन योजना आणि मासिक बचत योजनांच्या माध्यमातूनही नागरिकांकडून पैसे जमा करण्यात आले.


या प्रकरणात फिर्यादी चंद्रकिशोर नामदेव मांडवकर (वय ५२, रा. बोर्डा, ता. वरोरा) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींचे ८ लाख ८४ हजार १७४ रुपयांसह इतर १ हजार ३३१ गुंतवणूकदारांचे पैसे मिळून एकूण ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी संस्थेच्या संचालकांसह संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(५), ३१६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.

गुंतवणूकदारांसाठी पोलिसांचे आवाहन :

दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांना अद्याप त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळालेली नाही, अशा नागरिकांच्या रकमेच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे संबंधित गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, पैसे जमा केल्याच्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात रक्कम हवी आहे त्या खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत सोबत आणावी.

महाराष्ट्र शासनाच्या २५ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांनी परिशिष्ट-१ मधील नमुन्यात अर्ज भरून द्यायचा आहे.

यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे दुर्गापूर परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अतुल कावळे यांनी केले आहे.