Pombhurna News : घरासमोरच राडा! जुन्या वादातून कुटुंबाला मारहाण

Bhairav Diwase

पोंभुर्णा:-
तालुक्यातील जाम तुकूम येथे जुन्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांना काठ्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोंभूर्णा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेत वडील, मुलगा, आई व आठ वर्षीय मुलीला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांत दाखल तक्रारीनुसार श्रीकांत कामीडकर (वय २८, रा. जाम तुकूम) हे ३० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता चंद्रपूर येथून घरी परतले होते. घराच्या गेटजवळ वाहन उभे करून ते घराकडे जात असताना शेजारी राहणाऱ्या सुरेश सातरे यांनी मागून येऊन काठीने पायावर मारल्याचा आरोप श्रीकांत यांनी तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर विचारणा केली असता वाद वाढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर सुरेश गणपत सातरे आणि त्यांचे दोन मुलं संकेत व विनोद यांनी घराच्या आवारात येऊन काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेत श्रीकांतसह त्याचे आई-वडील व आठ वर्षीय अल्पवयीन मुलीलाही दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


तक्रारीच्या आधारे पोंभूर्णा पोलिसांनी सुरेश गणपत सातरे, संकेत सुरेश सातरे आणि विनोद सुरेश सातरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नरेश निमगडे करीत आहेत.