चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांनी शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पळसगाव (जाट) येथील शेतशिवारात तिळाची कापणी करण्यासाठी गेलेल्या नानाजी नारायण कामडी (वय ५५) यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. शनिवारी सायंकाळी ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोध घेतला. यावेळी शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.
तर दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा येथे घडली. शेतशिवारात तिळाची कापणी करत असताना वाघाने हल्ला केल्याने प्रेमिला पुंडलिक महाडोरे (वय ५५) यांचा मृत्यू झाला.
दोन दिवसांत घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

