काही स्वप्नं डोळ्यांत सहज जन्म घेतात; पण ती सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावावं लागतं. काहींच्या वाट्याला सुखसोयी येतात, तर काहींच्या वाट्याला संघर्ष. मात्र, मनात जिद्द असेल आणि मेहनतीची तयारी असेल, तर परिस्थितीच्या भिंती ओलांडूनही यशाचं शिखर गाठता येतं. ही गोष्ट आहे अशाच एका ग्रामीण भागातून आलेल्या, जिद्दीने संकटांशी दोन हात करणाऱ्या आणि खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका लेकीची!
बारावी पूर्ण झाली आणि वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तिनं स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय, तिची तयारी कशी करायची, याची तिला फारशी माहिती नव्हती. ग्रामीण भागातील एका छोट्याशा खेड्यातून ती शहरात आली. शहर तिच्यासाठी नवीन होतं. ना ओळखीची माणसं, ना मित्रमैत्रिणी आणि ना पुढचा रस्ता दाखवणारं कुणी!
घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिलांनी शेळ्या राखून आपल्या मुलाबाळांना शिकवलं, त्यांना जगण्याची शिकवण दिली. घरच्या परिस्थितीची जाणीव तिला होती. मात्र, शहरात राहायचं कसं, अभ्यास करायचा कसा आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं कसं, हे सगळं तिला हळूहळू शिकायचं होतं. काळ पुढे सरकत गेला. नवीन ओळखी झाल्या, मित्रमैत्रिणी मिळाल्या आणि एका अकॅडमीमध्ये प्रवेशही घेतला. मग सुरू झाला तिच्या स्वप्नांचा खरा प्रवास!
पहाटे उठायचं, मैदानावर सराव करायचा, अकॅडमीमध्ये वर्ग करायचे आणि त्यानंतर तासनतास अभ्यासिकेत बसून अभ्यास करायचा. दिवसामागून दिवस जात होते. शरीर थकत होतं, मन कधी निराश होत होतं; पण डोळ्यांसमोर एकच ध्येय होतं—खाकी वर्दी!
मित्रमैत्रिणी कधी सोबती झाले, तर कधी जिवाभावाचे आधार बनले, हे तिलाही कळलं नाही. या प्रवासात तिला साथ मिळत होती; पण स्वप्न पूर्ण करण्यासाठीची मेहनत मात्र तिलाच करायची होती. अखेर भरतीची वेळ आली. तिनं अर्ज भरला. भरतीसाठी ती शहरापासून दूर असलेल्या जिल्ह्यात पोहोचली. तिच्यासाठी तो केवळ एक जिल्हा नव्हता, तर अनेकांच्या स्वप्नांना पंख देणारी स्वप्नांची नगरी होती. पहिलीच भरती! मनात उत्सुकता होती, धाकधूक होती आणि यशाची आशाही होती. तिनं धावण्याचा प्रयत्न केला, मैदान गाठलं; पण कुठेतरी कमी पडली. पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं. पण अपयशानं ती संपली नाही. ती थांबली नाही. ती पुन्हा उभी राहिली!
पहिल्या अपयशानंतर पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला. सकाळी मैदान, दिवसा वर्ग आणि तासनतास अभ्यासिका. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा होता. प्रत्येक सराव तिच्या स्वप्नाच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल होतं. पुन्हा भरतीची चाहूल लागली. यावेळी तिनं आपल्या जिल्ह्यातच अर्ज भरण्याचा निर्धार केला. अर्ज भरला आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं सराव सुरू केला. तिची मेहनत सुरू होती. दिवस जात होते. मैदानी चाचणी जवळ येत होती. आता तिला केवळ धावायचं नव्हतं, तर स्वतःच्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं होतं. मात्र, नियतीनं तिच्यासमोर एक अनपेक्षित संकट उभं केलं! मैदानी चाचणीला अवघे काही तास शिल्लक होते. अशा वेळी देव परिक्षा बघत होता. क्षणभर तिला काय करावं, कुणाला सांगावं, कुणाची मदत घ्यावी, काहीच सुचत नव्हतं. मनात असंख्य प्रश्न होते. भावनांचा कल्लोळ सुरू होता.
एका बाजूला मनाला हादरवणारा प्रसंग, तर दुसऱ्या बाजूला अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर आलेली भरतीची संधी! काय करावं? थांबावं की पुढे जावं? मनातली वेदना कुणासमोर व्यक्त करावी? तिनं स्वतःला सावरलं. घरच्यांना आणि नातेवाईकांना या प्रसंगाची माहिती कळू नये, अशी तिची धडपड होती. मनात भीती होती, काळजी होती; पण चेहऱ्यावर शांतता होती. कदाचित त्या क्षणी तिची खरी परीक्षा मैदानावर नव्हतीच. तिची परीक्षा होती मन सावरण्याची, स्वतःला सावरून पुन्हा उभं राहण्याची!
मैदानी चाचणीचा दिवस उजाडला. मनात कितीतरी गोष्टी सुरू असतानाही तिनं स्वतःला एकवटलं आणि मैदान गाठलं. तिनं पूर्ण ताकदीनं धाव घेतली. शरीराची मर्यादा, मनावरचा ताण आणि परिस्थितीचं ओझं बाजूला सारून ती धावत राहिली. ही धाव केवळ काही मीटरची नव्हती; ती तिच्या स्वप्नासाठी, कुटुंबाच्या अपेक्षांसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी होती. त्या क्षणी डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अनेक दिवसांच्या मेहनतीला यशाची पहिली पावती मिळाली होती. पण अजून अंतिम शर्यत बाकी होती. मैदानी चाचणी पार पडली होती; आता लेखी परीक्षेचं आव्हान समोर होतं. तिचा स्वतःवर विश्वास होता. मेहनत केली होती, अभ्यास केला होता आणि आता त्या मेहनतीवर विश्वास ठेवण्याची वेळ आली होती. तिनं लेखी परीक्षा दिली. गुणही मिळाले. मात्र, जागा मर्यादित असल्यामुळे अंतिम यादीत आपलं नाव येईल की नाही, याची धाकधूक मनात होती. प्रत्येक क्षण जड जात होता. अखेर एक दिवस सायंकाळी निकालाची यादी प्रसिद्ध झाली.
तिनं यादी पाहिली...
आणि त्या यादीत तिचं नाव होतं!
होय, तिचं नाव! तिच्या मेहनतीचं नाव, तिच्या जिद्दीचं नाव, तिच्या स्वप्नाचं नाव!
वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या-विसाव्या वर्षी पोलीस होण्याचं स्वप्न साकार झालं. ज्या खाकी वर्दीसाठी तिनं दिवस-रात्र मेहनत केली, ज्या स्वप्नासाठी अपयश पचवलं आणि संकटांशी सामना केला, त्या स्वप्नाच्या दिशेनं तिनं मोठं पाऊल टाकलं. घरच्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ‘माझी मुलगी पोलीस झाली!’ हा अभिमान त्यांच्या आनंदाला शब्दांपलीकडे घेऊन गेला. शेळ्या राखून मुलाबाळांना शिकवणाऱ्या वडिलांच्या कष्टांना जणू यशाची सोनेरी किनार लाभली होती.
अर्थात, प्रशिक्षण पूर्ण करून कर्तव्यावर रुजू होण्याचा प्रवास अजून बाकी होता. पण तिच्या आयुष्यातील हा दिवस मात्र कायमचा लक्षात राहणारा ठरला. खाकी हे केवळ स्वप्न नाही, ती जबाबदारीही आहे!
आज तिच्या स्वप्नाला दिशा मिळाली आहे. येणाऱ्या काळात प्रशिक्षण पूर्ण करून ती कर्तव्यावर रुजू होईल. भविष्यात आणखी शिक्षण घेऊन मोठी अधिकारी व्हावं, हिच इच्छा आहे.
तिचा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो—परिस्थिती कितीही कठीण असली, अपयश कितीही मोठं असलं आणि मनावर कितीही दुःख असलं, तरी ध्येयाप्रती असलेली निष्ठा आपल्याला पुढे जाण्याचं बळ देऊ शकते.
प्रत्येक यशामागे केवळ हुशारी नसते; त्यामागे असतो घाम, त्याग, संयम, कुटुंबाचे कष्ट आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास!
तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तिच्या हातून समाजाची सेवा घडो, ती कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बनो आणि भविष्यात आणखी मोठं यश संपादन करो, हीच सदिच्छा!
### मला आता एवढंच कळलं...
मेहनत कधी वाया जात नाही. अपयश म्हणजे शेवट नसतो. आणि स्वप्नं खरी करायची असतील, तर परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी ठेवावी लागते!
— सोंगाड्याचा झोरा
७/१२ वर
आधार न्यूज नेटवर्क दरवेळी असेच भन्नाट, मनोरंजक आणि विचार करायला लावणारे विषय आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. ‘सोंगाड्याचा झोरा — ७/१२ वर’ या सदराखाली खास तुमच्यासाठी!
वाचत राहा... आधार न्यूज नेटवर्क!
