Pombhurna News: बालहक्क अन् सायबर सुरक्षेचे धडे; कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Bhairav Diwase

पोंभुर्णा:-
पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नुकताच विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा ‘विद्यार्थी विधी साक्षरता व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम’ अतिशय उत्साहात पार पडला. इंजि. वैभव पिंपळशेंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शिका म्हणून ॲड. गायत्री उरकुडे यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क, त्यांचे अधिकार व कर्तव्ये, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच महिला सुरक्षेसंबंधीचे कायदे यावर मोलाचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कायदेशीर उत्तरे देत त्यांचे शंका निरसन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. तर रविंद्र तेलसे सर यांनी कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी संचालन केले. ज्येष्ठ शिक्षक निमगडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लहान वयातच विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये कायद्याचा आदर, सामाजिक जाणिवा आणि एक सजग नागरिक म्हणून घडण्याची प्रेरणा निर्माण होणार आहे. पोंभुर्णा परिसरातून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.