Rajura Police : पोलीस स्टेशनमध्येच खर्रा-तंबाखूच्या पिचकाऱ्या; नियमांची अंमलबजावणी कोण करणार?

Bhairav Diwase

राजुरा:-
राजुरा पोलीस स्टेशन परिसरातच खर्रा आणि तंबाखू खाऊन थुंकण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, परिसरात थुंकणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र, त्याच परिसरात ठिकठिकाणी खर्रा आणि तंबाखूच्या पिचकाऱ्या दिसून येत असल्याने पोलीस प्रशासनाच्या स्वच्छता नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाच्याच कार्यालय परिसरात अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप राजुरा येथून समोर आला आहे. राजुरा पोलीस स्टेशनच्या आवारात खर्रा, तंबाखू किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या इशाऱ्यानंतरही पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागाजवळ ठिकठिकाणी खर्रा आणि तंबाखू खाऊन थुंकल्याचे लाल डाग दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


विशेष म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा दिला जातो. मात्र, ज्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते, त्याच नियमांचे पालन पोलीस स्टेशन परिसरात होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.


शासनाचे स्वच्छतेचे नियम केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत का? शासकीय कार्यालये आणि तेथील कर्मचाऱ्यांनाही हे नियम लागू आहेत की नाहीत? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस प्रशासनाने सर्वप्रथम स्वतःच्या कार्यालय परिसरात स्वच्छता राखून समाजासमोर आदर्श निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे राजुरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन परिसराची पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणताही भेदभाव न करता नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.