चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिवाळीच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले असून, रस्त्यावर फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे उडालेली गिट्टी थेट डोक्याला लागल्याने अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कृष्णली ठोंबरे (वय ५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णली आपल्या वडिलांसोबत दुचाकीने आत्याकडे जात होती. दरम्यान, चंद्रपूर शहरातील गजानन मंदिर परिसरात काही मुले रस्त्यावर फटाके फोडत असल्याचे पाहून सुरक्षेच्या कारणास्तव तिच्या वडिलांनी दुचाकी थांबवली.
मात्र, त्याचवेळी फटाक्याचा मोठा स्फोट झाला आणि रस्त्यावरील गिट्टी उडून थेट कृष्णलीच्या डोक्याला लागली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने तिला तातडीने खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


