चंद्रपूर:- काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट. निमित्त होतं तेलुगू समाजाच्या बतुकम्मा महोत्सवाचं! यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली, हातात हात मिळाले आणि मुख्यमंत्रिपदाच्या उल्लेखाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला!
तेलुगु समाज बतुकम्मा कमिटीच्या वतीने डब्ल्यूसीएल, सीआरसी ग्राउंड, रयतवारी कॉलरी येथे बतुकम्मा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थिती लावत तेलुगू समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात तेलुगू समाजातील बंधू-भगिनींसह लहान मुलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
मात्र, या महोत्सवात सर्वांचं लक्ष वेधलं ते सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार यांच्या भेटीने! दोन्ही नेते समोरासमोर आले, त्यांनी एकमेकांशी हात मिळवला आणि याचवेळी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करत मिश्किल टिप्पणी केली. “दोनों में से कम से कम कोई न कोई सीएम होना चाहिए!” या सहजसुंदर टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन नेत्यांमधील हा हलकाफुलका संवाद महोत्सवाची रंगत वाढवणारा ठरला.
बतुकम्मा महोत्सवातील या भेटीची आणि मुख्यमंत्रिपदाच्या मिश्किल उल्लेखाची चर्चा आता राजकीय वर्तुळातही रंगण्याची शक्यता आहे.

