चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत विनापरवानगी मिरवणूक काढणे आणि सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण करणे 'चंद्रपूरचा राजा' गणेश मंडळाला चांगलेच महागात पडले आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियम मोडल्याप्रकरणी या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जनादरम्यान घडलेल्या प्रकाराची पोलीस प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. २६ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहरात सार्वजनिक गणेश मूर्तींच्या नियोजित विसर्जन मिरवणुका निघणार होत्या. त्यापूर्वीच दुपारी चार वाजण्याच्या सुमारास 'चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जटपुरा गेट' या मंडळाने प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा परवानगी न घेता अचानक विसर्जन मिरवणूक काढली.
या विनापरवानगी मिरवणुकीमुळे शहरातील दवा बाजार, केवळराम चौक, रामसेतू पूल ते विसर्जन पॉईंट या अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या मार्गावरून धावणाऱ्या रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, विसर्जन स्थळी पोहोचल्यानंतरही तब्बल २ ते ३ तास विसर्जनासाठी वेळ घालवण्यात आल्यामुळे मागे असलेल्या इतर गणेश मंडळांनाही मोठा त्रास झाला, ज्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी झालेल्या विसर्जन मिरवणुकीतही याच मंडळाने जटपुरा गेट येथे मोठ्या प्रमाणात आतिशबाजी करत इतर मंडळांच्या मार्गात अडथळा निर्माण केला होता. त्या वेळी मध्यस्थीनंतर मंडळ रवाना झाले असले, तरी त्यांनी मूर्ती विसर्जित न करता परस्पर मंडपात परत नेली होती.
या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत रामनगर पोलिसांनी 'चंद्रपूरचा राजा' गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर आणि सदस्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २८५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याच्या कलम १३५, १३८ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनातर्फे यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
