चंद्रपूर:- शेतात काम करणारा शेतकरी असो, मजुरीसाठी जंगलालगत जाणारा मजूर असो किंवा घरात पाळण्यात झोपलेले लहान मूल, आता कुणाचाच जीव सुरक्षित राहिलेला नाही. वाघ आणि बिबट्यांचे हल्ले थेट मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचले असून, निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूंचे सत्र सुरू असतानाच भंडारा जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांत दोन चिमुकल्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाला. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वनमंत्री गणेश नाईक कुठे आहेत? त्यांना या घटनांची साधी दखलही घ्यावीशी वाटत नाही का, असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
लहान बालकांच्या बळीनंतर नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मानव-वन्यजीव संघर्षाने गंभीर रूप धारण केले आहे. शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, जंगलात रोजगारासाठी जाणारे नागरिक वाघांच्या हल्ल्यांचे बळी ठरत आहेत. विशेष म्हणजे, आता वाघांचा वावर थेट गावांमध्ये आणि मानवी वस्त्यांच्या परिसरात वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील अलीकडच्या घटनांनी या संकटाची भीषणता अधोरेखित केली आहे. ५ नोव्हेंबरला लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे पाच वर्षीय बालकाचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर १३ नोव्हेंबरला पवनी तालुक्यातील तिर्री येथे घरात पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाला बिबट्याने उचलून नेले. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. घराच्या चार भिंतींतही बालक सुरक्षित नसल्याची परिस्थिती या घटनेने समोर आणली आहे. वडेट्टीवारांनी केले वनमंत्री गणेश नाईक लक्ष्य
या घटनांवरून वडेट्टीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना लक्ष्य केले. राज्यात वाघांच्या हल्ल्यांत सामान्य नागरिकांचे जीव जात आहेत. शेतकरी आणि मजुरांना शेतात जाणेही कठीण झाले आहे. वाघ थेट मानवी वस्त्यांमध्ये घुसून हल्ले करीत असताना सरकारकडून ठोस उपाययोजना का होत नाहीत? वनमंत्री नेमके कुठे आहेत आणि काय करीत आहेत? नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जंगलाचे रक्षण करणाऱ्या स्थानिक नागरिकांचाच जीव आज धोक्यात आला आहे. यात त्यांचा काय दोष? एखाद्या जंगली डुकराची शिकार झाली तर वनविभाग तातडीने दहा-दहा जणांवर कारवाई करतो. मग वाघांच्या हल्ल्यांत निष्पाप माणसांचे बळी जात असताना वन विभाग आणि सरकारची जबाबदारी कोण घेणार? लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
नुकसान भरपाईने प्रश्न सुटणार नाही
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी केवळ नुकसानभरपाई देऊन किंवा घटना घडल्यानंतर वन विभागाचे पथक पाठवून प्रश्न सुटणार नाही. वारंवार हल्ले होणाऱ्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची गरज आहे. मात्र, सरकारकडून त्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप आहे. वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे आहेच, पण त्यासाठी माणसांचे बळी किती दिवस दिले जाणार? वनमंत्र्यांनी आता आश्वासनांपलीकडे जाऊन कृती करावी, अशी मागणी त्यांनी केली.


