Leopard attack : "माझं बाळ मला परत द्या, पैसे नकोत..." ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

Bhairav Diwase

भंडारा:-
'माझं बाळ मला परत द्या, पैसे नकोत' अशी आर्त भूमिका घेत कुटुंबीयांनी अद्विकचा मृतदेह ताब्यात घेण्यास आणि आर्थिक मदत स्वीकारण्यास नकार दिला. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील तिर्री गावात घडलेल्या घटनेने घराच्या चार भिंतीदेखील आता सुरक्षित राहिल्या आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मिन्सी-तिर्री मार्गावरील तिर्री गावात एक दुर्दैवी घटना घडली. अभिमन बोंद्रे यांच्या घरात पाळण्यात झोपलेल्या त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेले. या हल्ल्यात अद्विकचा मृत्यू झाला.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी अद्विक घरातील पाळण्यात शांतपणे झोपला होता. त्याची आई हेमलता बोंद्रे घरात स्वयंपाक करण्याच्या कामात व्यस्त होती. घरात कुटुंबीय असतानाच अचानक मागील बाजूने बिबट्याने प्रवेश केला. काही क्षणांतच त्याने पाळण्यात झोपलेल्या बालकावर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून घराबाहेर नेले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आईला मोठा धक्का बसला. तिने आरडाओरड करीत बिबट्याच्या मागे धाव घेतली. आवाज ऐकून आसपासचे ग्रामस्थही घटनास्थळी जमा झाले. परिसरात शोधाशोध सुरू झाली. जवळच असलेल्या तुरीच्या शेतात वन्यप्राण्याने बालकाला नेल्याचे आढळून आले. काही वेळानंतर बाळाचा शोध लागला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.