सोलापूर:- सोलापूर-अक्कलकोट मार्गावरील समर्थ शिवनेरी हॉटेल शेजारील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण १५ वाहनांना आगीचा धोका निर्माण झाला. यापैकी ५ वाहने आगीत पूर्णपणे जळून खाक झाली, तर उर्वरित १० वाहने सुरक्षित वाचवण्यात यश आले. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. वाहनांना नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपासा नंतर हे कारण स्पष्ट होईल.
अक्कलकोट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी हे कोर्सेगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त जात असताना करजगी येथे त्यांना या घटनेची माहिती मिळाली. सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी सुरू असलेला प्रवास थांबवून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थितीची पाहणी करून अक्कलकोट नगरपरिषद, अन्नछत्र मंडळ अक्कलकोट, सोलापूर महानगरपालिका, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, एनटीपीसी आणि जय हिंद शुगर प्रा.लि. अशा पाच ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पाचारण केल्या.
मिलनदादांनी स्वतः पुढाकार घेत विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधल्यामुळे पाच अग्निशमन दलांच्या मदतीने युद्धपातळीवर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. या मदतकार्यात पोलिस प्रशासन, महावितरण, नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या तत्पर पुढाकाराची जोड मिळाल्याने आगीचा अधिक फैलाव रोखण्यात आणि उर्वरित १० वाहने वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. सणासुदीच्या काळात स्वतःचा नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घटनास्थळी घेतल्याने उर्वरित वाहने वाचवण्यात यश आले.


