Gadchiroli News: गडचिरोलीतील 'जिलानी सरकार' यांचे निधन

Bhairav Diwase
गडचिरोली:- गडचिरोली शहरासह संपूर्ण देशात आणि परदेशातही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध सुन्नी सूफी संत आणि तपस्वी हजरत सय्यद अहमद जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे रविवार (ता. २७) दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आणि त्यांच्या भक्त परिवारात तीव्र शोककळा पसरली आहे.


जिलानी बाबा हे गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली येथील रामनगर भागात वास्तव्यास होते. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांमध्ये त्यांना अत्यंत आदराचे स्थान आहे. अत्यंत साधे राहणीमान आणि आध्यात्मिक शक्तीच्या बळावर त्यांनी हजारो लोकांना योग्य आणि सन्मार्गाचा रस्ता दाखवला होता. जिलानी बाबा यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी (दरबार) मध्ये दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्मोत्सव (आमद दिन) आणि उर्स सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.


या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि देशभरातून हजारो भाविक त्यांच्या केवळ एका दीदारसाठी (दर्शनासाठी) गडचिरोलीत दाखल होत असत. रविवारी संध्याकाळपासूनच जिलानी बाबा यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी भाविकांनी प्रचंड गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिलानी बाबा यांचा अंत्यविधी पाल नदी परीसरात होणार असल्याने आरमोरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत संध्याकाळी ६ वाजतानंतर आरमोरी रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.