Chandrapur News : उमेदवार वंजारी, पण तयारीवर प्रश्नचिन्ह? धानोरकरांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत तयारीचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या प्रचारासाठी आज चंद्रपूर शहरात पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्यात बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाच्या निवडणूक तयारीवरच प्रश्न उपस्थित केले.

या निवडणुकीत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते अपेक्षित सक्रियतेने काम करत नसल्याची खंत धानोरकर यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, अभिजीत वंजारी हे उमेदवार असल्याची माहिती असूनही निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी आणि संघटनात्मक सक्रियता दिसून येत नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या निवडणूक तयारीवरच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बोट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


आता धानोरकर यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या प्रचाराला वेग येणार की पक्षातील निवडणूक तयारीबाबत नव्या चर्चा सुरू होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.