गोंडपिपरी:- पावसाने पाठ फिरवली, पाण्याचे स्रोत आटले आणि शेतातील पिके करपू लागली. अशा परिस्थितीत गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावातील दोन वृद्ध महिला आपली शेती वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत.
नाल्यात खड्डा खोदून साचलेले पाणी पाइपच्या साहाय्याने शेतात नेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ना मोटारपंपाची पुरेशी सुविधा, ना सिंचनासाठी मुबलक पाणी! तरीही डोळ्यांदेखत पिके नष्ट होताना पाहायची कशी, या भावनेतून त्यांचा संघर्ष सुरू आहे.
एवढा आटापिटा करूनही पीक वाचेल की नाही, याची शाश्वती नाही. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत पीक वाचवण्याची आशा त्यांनी सोडलेली नाही.

