RTO Chandrapur : चंद्रपूरकरांची पसंतीच्या नंबरसाठी लाखोंची उधळण; RTO च्या तिजोरीत 2.20 कोटींचा महसूल!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- वाहनाचा नंबरही आता प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. आपल्या आवडीचा, जन्मतारखेशी संबंधित किंवा शुभ मानला जाणारा नंबर मिळवण्यासाठी नागरिक लाखो रुपये मोजत आहेत. चंद्रपुरातही पसंतीच्या वाहन क्रमांकांची क्रेझ वाढत असून, यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ०००७ आणि ५५५५ हे क्रमांक सर्वाधिक महाग ठरले आहेत. आपली गाडी असावी खास आणि तिचा नंबरही असावा हटके! यासाठी चंद्रपूरकर आता हजारो नव्हे, तर लाखो रुपये खर्च करण्यास तयार आहेत.

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आकर्षक आणि पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकांसाठी नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात पसंतीच्या क्रमांकांसाठी तब्बल १ हजार ८१६ अर्ज दाखल झाले. या माध्यमातून RTO ला २ कोटी २० लाख ६८ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसुलात ६६ लाख २१ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. २०२४-२५ या वर्षात १ हजार ५१० अर्जांमधून १ कोटी ५४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा अर्जांच्या संख्येतही ३०६ ने वाढ झाली आहे.


चंद्रपूर RTO मधील उपलब्ध नोंदीनुसार, ०००७ आणि ५५५५ या आकर्षक क्रमांकांसाठी प्रत्येकी २ लाख १० हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. याशिवाय ०००९, ०१११, ००११, ०००५ आणि ७७७७ यांसारख्या व्हीआयपी क्रमांकांनाही नागरिकांकडून मोठी मागणी आहे. आवडीचा अंक, शुभ मानला जाणारा क्रमांक किंवा इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करणारा नंबर मिळवण्यासाठी नागरिकांचा हा उत्साह पाहता, आकर्षक वाहन क्रमांकांची बाजारपेठ चांगलीच तेजीत असल्याचे दिसून येते.


एकीकडे वाहन खरेदीचा खर्च आणि दुसरीकडे पसंतीच्या नंबरसाठी लाखोंची तयारी! चंद्रपूरकरांचा हा कल RTO च्या वाढत्या महसुलातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे वाहन कोणतेही असो, मात्र नंबर आपल्या पसंतीचा हवा, हीच सध्या चंद्रपुरात व्हीआयपी नंबरची क्रेझ बनली आहे.