चंद्रपूर:- "केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे आणि हुकूमशाही प्रवृत्तीमुळे आज संपूर्ण देशात अराजकता पसरली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता संपुष्टात आली असून लोकशाही व्यवस्था आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार धोक्यात आले आहेत. या संपूर्ण अराजकतेला आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावाला जबाबदार असणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ते राजीनामा देईपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही आणि आमचा हा संघर्ष असाच तीव्र राहील," असा घणाघाती इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. Mp Pratibha Dhanorkar
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाओ सप्ताह’ अंतर्गत ‘वोट बचाओ - देश बचाओ’ या जनआंदोलनादरम्यान त्या बोलत होत्या. चंद्रपूर येथील ऐतिहासिक गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पैदल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले. Chandrapur News
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना खासदार प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाल्या, "‘वोट बचाओ – देश बचाओ’ हा केवळ एक नारा नसून सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी पुकारलेला लढा आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या अधिकारांशी आणि संविधानिक मूल्यांशी जोडलेली व्यवस्था आहे. मतदारांचा अधिकार सुरक्षित राहणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण होणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील. congress
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आमचे नेते मा. राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेस पक्ष आणि 'इंडिया' आघाडी सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहे आणि नागरिकांनीही आपल्या अधिकारांसाठी जागृक राहणे आवश्यक आहे. Chandrapur congress
जाहीर सभेनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह विविध प्रमुख मागण्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांच्या नावे सादर केले.

